हिरण्यदुर्ग
केतुमाल आणी सिंहभद्र हे महाराष्ट्रदेशी जाण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून सातपुड्याच्या दुर्गम पर्वतरांगांमधून जात असताना त्यांची भेट होते. पुढे अनवट, अवघड वाटा त्यांना थकवितात. प्राचीन शिवमंदिरातील एक कुबडा योगी त्यांना धर्मपालच्या झोपडीपर्यंत कसे पोचायचे ते सांगतो. जलग्रामी जाण्यासाठी आतुर झालेल्या सिंहभद्र, आणि केतुमाल एका दाट काळोख्यातून बाहेर पडतात.
धनगर वस्तीवर त्यांचे स्वागत होते. तेथे धर्मपालाला महाकेतूने पकडले असून, त्याचे प्राण वाचविण्यासाठी, सिंहभद्र, रवाना होतो; तर केतूमाल राजकन्या, देवसेनेची शुश्रूषा करून आपल्या राजकार्यासाठी हिरण्यदुर्गाकडे, कुच करतो. तेथूनच या दोघांच्या आयुष्याला कलाटणी मिळते. सिंहभद्र, हा सातवाहन राजा शक्तीश्री यांचे राज्य महाकेतूच्या तावडीतून वाचविण्यासाठी आलेला आहे, अशी भावना सर्वांची होते; तर केतूमाल हा महाकेतूचा मुलगा पुलोमा म्हणून पुन्हा विध्वंस करायला आलेला असतो.
यातच गरुडवंशी विरुद्ध नागवंशी हा जन्मजन्मांतरीचा संघर्ष अखेर संपवावा, अशी सर्वांची इच्छा असते. तो कसा संपतो, हे संजय सोनवणी यांच्या हिरण्यदुर्गमध्ये वाचायला मिळते. अद्भूत, अचाट, अनाकलनीय घटना, भयकारी विनाश, पिशाच्ची मंतरलेल्या शक्ती या सर्वांचे मिश्रण या कादंबरीत आहे.