जाती संस्थेचा इतिहास
जात नाही ती 'जात 'अशी जातीची व्याख्या केली जाते. भारतीय समाजरचना ही जातीवर आधारित असल्याने राजकारणासह कोणतेही क्षेत्र असले तरी तेथे जातीचा शिरकाव झालेला दिसतो; पण खरेच जातीची परंपरा पूर्वीपासून आहे का? या प्रश्नाचे उत्तर संजय सोनवणी त्यांच्या 'जातीसंस्थेचा इतिहास' मधून देतात.
जाती आज आहेत तशा हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात नव्हत्या. जसजसा मानव स्थिर होत गेला, प्रगत होत गेला, तसा समाज वाढला. समाजाच्या गरजेतून धर्म निर्माण झाले. समाजाच्या गरजेपोटी नवे शोध लागले. त्यातून नवे व्यवसाय आकारला आले. प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार व्यवसाय स्वीकारले. नंतरच्या काळात भारतात वैदिक धर्माचे प्रस्थ वाढले आणि जो व्यवसाय लोक करीत होते, त्यांच्या जाती निर्माण झाल्या.
दहाव्या शतकापासून जातीव्यवस्था जन्माधारित बनू लागली. त्यातून श्रेष्ठ - कनिष्ठ भेदभाव निर्माण झाले. हा सर्व जातिव्यवस्थेचा इतिहास, जाती नष्ट होण्यासाठी झालेले प्रयन्त, ती नष्ट का होत नाही याची कारणमीमांसा, आरक्षण, विविध जातींचा इतिहास यात मांडला आहे.