आमच्याबद्द्ल ..

(लोकसत्ता, वाचनरंग, २३ नोव्हेंबर २००९)
प्राजक्त प्रकाशन या संस्थेची जालिंदर चांदगुडे यांनी १९९९ साली स्थापना केली. वेगवेगळ्या वाटेवरची दीडशेपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित करणाऱ्या चांदगुडे यांनी आपल्या व्यवसायाची सुरवातच मुळी एकदम पाच पुस्तकांच्या प्रकाशनाने केली होती. त्यानंतर त्यांनी गेल्या १० वर्षात कधीच मागे वळून पाहिलेलं नाही.
सुरेश वैद्य, प्रभाकर बागुल, पद्मा कुलकर्णी, प्रश्न. व. बा. बोधे आणि भास्कर महाजन अशी पाच लेखकांची पुस्तके प्रकाशित करून श्री. चांदगुडे यांनी व्यवसायाचा श्रीगणेशा केला. बालसाहित्य, प्रवास वर्णन, कादंबरी, अनुवाद, ऐतिहासिक आणि चरित्र व कथासंग्रह असे सर्व वाङ्मयप्रकार त्यांनी आपल्या प्रकाशनामार्फत प्रसिद्ध केले. ज्येष्ठ पत्रकार आणि सध्या माहिती आयुक्त म्हणून काम करत असलेल्या विजय कुवळेकर यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळत असल्याचे श्री. चांदगुडे सांगतात, प्रकाशन व्यवसाय सुरू केल्यावर ज्येष्ठ लेखक निरंजन घाटे यांची खूप मदत झाल्याचे ते सांगतात. आजही या दोघांचं मार्गदर्शन माझ्यासाठी अत्यंत मोलाचं असल्याचं श्री. चांदगुडे यांनी सांगितले. विविध प्रकारची पुस्तक प्रकाशित करणाऱ्या जालिंदर चांदगुडे यांच्या प्राजक्त प्रकाशनाकडे नर्मदा परिक्रमा करणाऱ्या जगन्नाथ कुंटे याचं ‘नर्मदेऽऽ हर हर’ हे पुस्तक प्रकाशनासाठी आलं आणि मग वेगळाच इतिहास घडला. अवघ्या चार वर्षात या पुस्तकाच्या नऊ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या, आता दहावी आवृत्ती प्रकाशनाच्या मार्गावर आहे. ‘नर्मदे ऽऽ हर हर’ या पुस्तकामुळे प्राजक्त प्रकाशन सर्वतोमुखी झालं. हे वेगळ्या विषयावरचे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलचं पण कुंटे यांचं ‘साधनामस्त’ हे दुसरं पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केले. अवघ्या चार वर्षात त्यांच्या सात आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याचंच ‘नित्य निरंजन’ हे पुस्तकही त्यानं प्रसिद्ध केलं. या पुस्तकाच्या दोन वर्षात सहा आवृत्त्या निघाल्या आहेत. कुंटे यांचीच मागीलवर्षी त्यांनी ‘कालिंदी’ ही कादंबरी प्रसिद्ध केली एका वर्षात या पुस्तकाच्याही पाच आवृत्त्या निघाल्या आहेत.
कुंटे यांच्या पुस्तकांनी प्राजक्त प्रकाशनाला वेगळी ओळख मिळवून दिली. चांदगुडे यांनी बालवाङमयातही महाभारतामधील आदर्श व्यक्तीरेखांवरची दहा पुस्तकांची माला प्रसिद्ध केली. आता ते आगामी वर्षात मुलांसाठीच संस्कारक्षम अशा पन्नास पुस्तकांचा संच प्रसिद्ध करणार आहेत. वास्तुशास्त्रावरील चार ते पाच पुस्तके प्रसिद्ध करून रा. का. बर्वे यांचं ‘तुम्हीच व्हा जोतिषी’ हे आगळं वेगळं पुस्तकही त्यांनी प्रसिद्ध केलं. माहितीच्या अधिकारासंबंधी सविस्तर माहिती देणारं पुस्तकही त्यांनी प्रसिद्ध केलं आहे. बाबामहाराज सातारकर यांच्या जीवनावरील कादंबरी त्यांनी प्रसिद्ध केली, त्यालाही वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन ज. यादव यांनी अनुवादित केलेले ‘श्री साई चरित्र दर्शन’ हे पुस्तक नुकतेच त्यांनी प्रकाशित केले. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
या संपूर्ण कालखंडात विविध पुस्तके प्रकाशित करताना हृषिकेश मुखर्जी यांच्या चित्रपट प्रवासाबद्दल ‘हृषिदा-एक आनंदयात्री’ हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं. आता एकनाथ महाराजांच्या जीवनावरील 'एकोबा' या पुस्तकाच्या कामात तसेच ‘अनोखा अलास्का’ हे प्रवास वर्णनात्मक पुस्तक प्रसिद्ध करण्याच्या कामात श्री. चांदगुडे हे सध्या मग्न आहेत.